नवनीतग्राम पहाडावर उभारणार राष्ट्रसंत तुकडोजींचा पुतळा

डॉ.खुणे यांच्या हस्ते भूमिपूजन

चामोर्शी : घोट-रेगडी- हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील नवनीतग्राम पहाडावर श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पहाडावर उभारण्यात येणाऱ्या तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्थळाला क-वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले. (अधिक बातमी खाली वाचा)

या कार्यक्रमाला मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानु उपाध्ये, संदीप भोवरे, प्रवीण गेडाम व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ.खुणे यांनी म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने सरसावले पाहिजे. राष्ट्रसंताच्या विचारांची आज देशाला गरज आहे. नवनीतग्राम पहाडाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

यावेळी गुरुदेव भक्तांसोबत त्यांनी पहाडाची पाहणी केली आणि सोयीसुविधांचा आढावा घेतला. येथील विकास कामांबाबत आमदार डॉ.मिलिंद नरोटे व वनपरिक्षेत्राधिकारी वाडीघरे यांच्यासोबत त्यांनी भ्रमणध्वनीवरून सविस्तर चर्चाही केली. याप्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे नोनीगोपाल हलदर व ग्रामपंचायत हळदवाहीअंतर्गत विविध गावातील गुरुदेव भक्त उपस्थित होते.