वासाळा येथे लोकवर्गणीतून साकारणार शिवरायांचा पुतळा

मा.आ.गजबे यांच्या हस्ते भूमिपूजन

आरमोरी : तालुक्यातील वासाळा गावातील तरुणांनी आणि गावातील नागरिकांनी काही वर्षांपूर्वी आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची संकल्पना मांडली होती. सर्वांनी एकमुखाने त्याला मान्यता दिल्यानंतर पुतळा उभारण्याकरिता लागणाऱ्या सर्व शासकीय परवानगीची पूर्तता करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रत्यक्षपणे या कामाला सुरुवात करण्यात आली.

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे गावातील लोकांच्या वर्गणीतून हे काम पूर्ण होणार आहे. वासाळा गावातील प्रत्येकाचा त्यामध्ये हातभार लागला आहे.

सोबतच पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तींनी देखील या कामी मदतीचा हात दिला आहे. सर्वांच्या मदतीने आणि सहकार्याने वासाळा गावामध्ये अतिशय सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे.

या भूमिपूजनाप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, ज्येष्ठ नेते रामभाऊ पडोळे, गोलू वाघरे, आशिष वरखडे, विकास बोरकर, अनिल आलमकर, अरविंद शेलोटे, कालिदास मेश्राम, मोरेश्वर मेश्राम, नीलकंठ मगरे, प्रमोद सेलोटे, आसिक बोरकर, विजय जराते, रवी सेलोटे, बाबुराव भोयर, दिलीप राऊत, प्रफुल मगरे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

सर्वांचा सहभाग असल्यामुळे हे पुतळा उभारणीचे काम लवकर आणि चांगल्या दर्जाचे होईल, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.