गडचिरोली : येथील प्लॅटिनम ज्युबिली शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी सोहम नंदिनी-पवनकुमार चिलमवार या विद्यार्थ्याने नागपूर विभागीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला असून तो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.
धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे 2024 चा विभागीय स्तरावरील अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा झाला. त्यात सोहमने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : संभाव्यता आणि आव्हाने’ या विषयावर कृत्रिम बुद्धिमत्तेची परिवर्तन शक्ती आणि तिच्या नैतिक आणि सामाजिक आव्हानांचाही सखोल अभ्यास केला.
सोहमच्या या नाविन्यपूर्ण सादरीकरणाने त्याला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात स्थान मिळवून दिले. शाळेचे महासचिव अझिज नाथानी यांनी सोहमच्या या यशाचे कौतुक करत सोहमची ही कामगिरी आमच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य दर्शवते. त्याच्या नाविन्यपूर्ण विचारसरणीने संपूर्ण विभागाचा अभिमान वाढवला आहे, अशा शब्दात त्याचे कौतुक केले. प्राचार्य रहीम अमलानी यांनी सोहमची विज्ञानातील निष्ठा आणि आवड त्याची चमक दाखवतेच, पण त्याचसोबत त्याची सामाजिक जाणीवही ठळकपणे प्रकट करते, असे म्हणत त्याचे कौतुक केले.
सोहमने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य रहिम अमलानी, सर्व शिक्षकवृंद, पालक आणि विशेषतः त्याचे मार्गदर्शक शिक्षक अमोल चापले आणि आशिक झाडे यांना दिले. अमोल चापले यांनी सोहमला मार्गदर्शन करत सादरीकरणासाठी विशेष मेहनत घेतली. आशिक झाडे यांनीही त्याला आवश्यक ते सहकार्य केले.