गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे राज्य मंडळाच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभात पार पडला. यावेळी भयमुक्त आणि कॅापीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विष्णू चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक एम.ई.ठाकूर, सुधीर शेंडे, व्ही.एस.देसू, आय.एम.कुमरे, स्वप्निल राठोड, अभय कांबळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जीवनचरित्रासह अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. त्यातून आयुष्यातील चढ-उताराला सामोरे जाण्याची शक्ती आपल्या अंगी निर्माण करावी. निर्व्यसनी जीवन जगावे व चांगले नागरिक म्हणून घडावे, असे आवाहन सुधीर शेंडे यांच्यासह उपस्थित शिक्षकांनी केले.
विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देताना शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनी भावूक झाल्या. बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी समई सप्रेम भेट दिली. यावेळी शिक्षक टी.ए.आस्कर, पद्मावती महेशगौरी, वर्षा मस्के, चंदा कोरचा, व्ही.एम.नैताम, कविता बारसागडे, संगीता पुराम, अधीक्षक गजानन सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, करिष्मा गोवर्धन, योगेश उसेंडी, सुनिता दुर्कीवार, संगीता करंगामी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अकरावीची विद्यार्थिनी अर्पिता आतला हिने, तर नववीची विद्यार्थिनी मनीषा वड्डे हिने आभार प्रदर्शन केले.