लॉयड्स फाउंडेशनचे क्रीडापटू राज्यस्तरीय अॅथलेटिक्समध्ये चमकले

मोनिका मडावी राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार

एटापल्ली : लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या हेडरी येथील क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेतलेल्या दोन विद्यार्थ्यांनी 18 आणि 19 मे रोजी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या राज्य ज्युनियर (अंडर-20) ओपन अॅथलेटिक्स स्पर्धामध्ये चमक दाखवली. यात उंच उडी आणि 10 हजार मीटर शर्यतीत अनुक्रमे दुसरे आणि चौथे स्थान मिळवून गडचिरोली जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

एटापल्ली येथील मोनिका सन्नू मडावी हिने उंच उडी स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले. त्यामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेतलेला आणखी एक विद्यार्थी यश पांढेकर याने अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 10 हजार मीटर शर्यतीत चौथा क्रमांक पटकावला.

याशिवाय, विदर्भ राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा-2025 साठी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय निवड चाचण्यांमध्ये, लॉयड्स क्रीडा संकुलाच्या आठ विद्यार्थ्यांची 18 वर्षांखालील गटात राज्य शिबिरासाठी निवड झाली. यामध्ये पाच मुली आणि तीन मुलांचा समावेश आहे. राज्य शिबिरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये उडेरा गावातील पायल तलांडी आणि समिरा गोटा, तुमरगुंडा येथील विद्या गावडे, वांगेतुरी येथील आशा नरोटी, मरकल येथील सपना पुंगाटी, कोनसरी येथील महाश कुडे आणि स्वतंत्र आडे, तसेच तुमरगुंडा येथील अमोल वारसे यांचा समावेश आहे. राज्य शिबिर 22 मे रोजी गडचिरोली येथे होणार आहे.

याआधी, यावर्षी जानेवारीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील रामकृष्णपूर गावातील सुजिता बिश्वासने नागपूर येथे महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 18 वर्षांखालील (मुली) गटात तिसरे स्थान पटकावले होते. तिची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक स्पर्धेत, लॉयड्सतर्फे प्रशिक्षित विद्यार्थी आपला ठसा उमटवून गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला नवीन उंचीवर नेत आहेत.