मोहगावच्या गोंडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे बळ

लंडनच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद

गडचिरोली : आदिवासी भाषिक आणि सांस्कृतिक संघर्षाचं प्रतीक ठरलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या मोहगावच्या गोंडी शाळेतील विद्यार्थ्यांनी एक आगळा-वेगळा अनुभव घेतला. या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मिटिंगच्या माध्यमातून लंडनमधील ऐतिहासिक आणि शैक्षणिक स्थळं पाहिली. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांनी तेथील काही विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

या अनोख्या ऑनलाईन लंडनभ्रमंतीदरम्यान विद्यार्थ्यांनी किंग्स क्रॉस स्टेशन, ब्रिटिश लायब्ररी, सोस विद्यापीठ, बेर्कबेक विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ हायजीन अ‍ॅण्ड ट्रॉपिकल मेडीसिन, आणि सिनेट हाऊस लायब्ररी यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांना ऑनलाईन भेट दिली. या उपक्रमामागे गोंडीशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण करणे, तसेच उच्च शिक्षणाबाबत गोडी निर्माण करणे हा होता. या उपक्रमामध्ये लंडनहून अॅड.बोधी रामटेके यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठांमध्ये जाऊन तेथील संधी आणि शिक्षण पद्धतीबाबत मार्गदर्शन केले.

अॅड.रामटेके हे स्वतः गेली दोन वर्षे युरोपातील विविध विद्यापीठांमध्ये कायद्याचे शिक्षण घेत असून सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर सक्रिय काम करत आहेत. मातृभाषेतील आणि सांस्कृतिक वातावरणातील शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन गेल्या 6 वर्षांपासून मोहगाव ग्रामसभाद्वारे गोंडी शाळा गोंडी आणि इंग्रजी भाषांमध्ये चालवली जात आहे. मात्र संविधानिक मूल्यांशी सुसंगत असूनही शाळेला अद्याप कोणतीही शासकीय मान्यता मिळालेली नाही. परिणामी शाळा एका कायदेशीर संघर्षातून जात आहे.

या शाळेचे प्रशासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच हा ऑनलाईन लंडनभ्रमंती उपक्रम राबवण्यात आला. या पुढेही विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या संधींबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी अशा अनेक उपक्रमांची आखणी केली जाईल, असे शिक्षक शेषराव गावडे यांनी सांगितले. या उपक्रमात गावडे यांच्यासह अविनाश श्रीरामे, ग्रामसभेचे देवसाय आतला, बावसू पावे व इतरांनी सहकार्य केले.