जिल्हाभरात २६४० विद्यार्थ्यांनी सोडविला स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर

पोलिसांच्या 'प्रोजेक्ट उडान'चे यश

पोलीस मुख्यालयातील खुल्या सभागृहात पेपर सोडविताना विद्यार्थी

गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची ओढ निर्माण व्हावी, यातून त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू व्हावी म्हणून पोलिस विभागाने ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत एक गाव एक वाचनालय हा उपक्रम हाती घेतला. त्याअंतर्गत नोंदणी केलेल्या २६४० विद्यार्थ्यांचा शनिवार दि.१५ जुलै रोजी स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर घेतला. जिल्ह्यात विविध ठिकाणी एकाचवेळी विद्यार्थ्यांनी हा पेपर सोडवून स्पर्धा परीक्षेच्या तयारीची झलक दाखविली.

गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांला योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे, योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत मागे पडतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धा परिक्षेविषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांना स्पर्धा परिक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून एक प्रयोग करण्यात आला. यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज मुंबई यांच्या पुढाकाराने “प्रोजेक्ट उडाण” अंतर्गत गडचिरोली पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृह, तसेच एक गाव एक वाचनालयाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्राच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या वाचनालयांमध्ये मोफत स्पर्धा परीक्षा सराव पेपर क्र.1 टेस्ट सिरीजचे आयोजन केले होते. याचा उपयोग विद्यार्थ्यांना येणाऱ्या तलाठी, वनरक्षक, संयुक्त परीक्षेकरीता होणार आहे.

दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणीही विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतीसाद दिला. अनेक ठिकाणी वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या सराव पेपरदरम्यान अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी मुख्यालयात पेपर देणाऱ्या ७३० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.