गोंडवाना विद्यापीठात क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्र सुरू

जीवनातील पैलूंवर टाकला प्रकाश

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी पार पडले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुरूदास कामडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील बिंझाणी सिटी कॉलेजचे राज्यशास्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.संदीप तुंडुरवार होते. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय गोरे, ननंदाजी सातपुते, विवेक गोर्लावार, अध्यासन केंद्राचे समन्व्यक डॉ.सत्यनारायण सुदेवाड प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी प्रा.डॉ.संदीप तुंडुरवार यांनी आपल्या व्याख्यानातून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.हेमराज निखाडे यांनी तर आभार डॉ.सत्यनारायण सुदेवाड यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्राच्या माध्यमातून मुंडा यांचे जीवन, संस्कृती, भाषा व त्यांच्या समस्या याबाबतच्या संशोधनाला वाव मिळणार आहे. त्या दृष्टीकोनातून गोंडवाना विद्यापीठात या केंद्राची स्थापना महत्वाची ठरणार आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्यासंदर्भात संशोधन आणि त्यावर आधारित विकास यावर संशोधन करण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय भारतातील इतर आदिवासींचे जीवन आणि समस्यांवर हे केंद्र संशोधन कार्य करू शकेल. संशोधनाच्सोबतच प्रबोधनाचेही कार्य या केंद्रामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.