लोक बिरादरी आश्रमशाळेच्या मुलींची खो-खो टिम पोहोचली राज्यस्तरावर

मल्लखांबमध्ये 13 विद्यार्थ्यांची निवड

गडचिरोली : हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी खो-खो आणि मल्लखांबमध्ये विभागीय स्पर्धा जिंकून राज्यस्तरावर धडक दिली आहे. राज्याच्या पूर्व टोकावरील दुर्गम भागातल्या 17 वर्ष वयोगटातील मुलींनी नागपूर विभागीय खो-खो स्पर्धेत नागपूर ग्रामीण संघाच्या चमुवर मात केली. आता ही चमू राज्यस्तरावर नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

विशेष म्हणजे लोक बिरादरी आश्रमशाळेच्या मुलींचा खो-खो संघ तालुका, जिल्हा आणि विभागीय स्पर्धा पार करत पहिल्यांदाच राज्यस्तरावर पोहोचल्याचा आनंद असून त्यासाठी सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षकांचे लोक बिरादरीचे संचालक अनिकेत आमटे यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

याशिवाय आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन, वरोरा येथे झालेल्या नागपूर विभागीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत लोक बिरादरी आश्रमशाळा हेमलकसा येथील 13 खेळाडूंनी विशेष कामगिरी केल्याने त्यांची राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेकरीता निवड झाली आहे.

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये 14 वर्षाखालील वयोगटात बलदेव महाका, 17 वर्षाखालील मुलांच्या गटात ओमकार मडावी, अभिनव दुर्वा, अर्जुन आलामी, अक्षय मट्टामी, मुलींच्या गटात सुहानी मडावी, माधुरी मज्जी, कोमल पुंगाटी, 19 वर्षाखालील मुलांच्या गटात तुलसीराम वड्डे, आकेश वड्डे, सुधाकर वड्डे, मुलींच्या गटात उर्मिला ताडो, शारदा वड्डे यांचा समावेश आहे. त्यांना प्रशिक्षक परमात्मा यांचे मार्गदर्शन मिळाले.