
गडचिरोली : जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या आणि बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या 22 विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा पोलीस दलाच्या भरतीत घवघवीत यश संपादन केले आहे. वसतिगृहात राहताना मिळालेले योग्य वातावरण आणि सराव यामुळे हे यश मिळाल्याची भावना समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॅा.सचिन मडावी यांनी व्यक्त केली.
समाजकल्याण कार्यालयात 150 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले सुसज्ज वाचनालय सुरू करण्यात आले आहे. हे वाचनालय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला आणि प्रगत शिक्षणाला चालना देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. मागील वर्षी या वाचनालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले होते. पोलीस भरतीसाठी या ठिकाणी विशेष वर्ग आणि प्रत्येक शनिवारी सराव पेपरचे आयोजन केले जात होते. या सर्व सुविधा विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे लेखी परीक्षेत इतर स्पर्धकांच्या तुलनेत हे विद्यार्थी सरस ठरले.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या या यशाने इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांसाठी आदर्श निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया सहाय्यक आयुक्त डॅा.सचिन मडावी यांनी व्यक्त केली.
हे आहेत पोलीस भरतीत निवड झालेले विद्यार्थी
नवेगाव मुलांचे वसतिगृह- बादल गावतुरे, अरुण उय्याला, प्रतीक धानफाले, गुलाब चौधरी
विसापूर मुलींचे वसतिगृह- क्रिष्णावेणी दुर्गम, सोनी खोब्रागडे
ओबीसी मुलींचे वसतिगृह- काजल आदे, राणी राऊत, आचल कुनघाडकर
ओबीली मुलांचे वसतिगृह – हर्ष दहलकर, स्वप्निल वासेकर, धीरज खेवले
समाजकल्याण वाचनालय- सुमेध रामटेके, सचिन मादमवार, विशाखा रोहनकर, विशाल वट्टी, विक्रम वट्टी, दर्शन दुग्गा
आश्रमशाळा येडानूर- अक्षय कुमरी, अंकेश कोंडागोर्ला.
































