…म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीत आले, ना.मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितले

दीक्षांत समारंभात डी.लिट.ने सन्मानित

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षांत सोहळा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात बुधवारी झाला. याप्रसंगी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी.लिट्.या उपाधीने सन्मानित करण्यात आले. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीत कसे आले याचा किस्सा सांगितला. हे विद्यापीठ चंद्रपुरात उभारायचे की गडचिरोलीत याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. पण त्यावेळी आमदार असलेले अशोक नेते यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतच असावे, असा आग्रह धरला आणि शेवटी त्यावर शिक्कामोर्तब केल्याचे ना.मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यांनी जाहीरपणे सांगितलेला हा किस्सा चर्चेचा विषय ठरला.

या समारंभाला कुलगुरु डॉ.प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.प्रविण पोटदुखे, वित्त व लेखाधिकारी सीए भास्कर पठारे व्यासपीठावर उपस्थित होते. याशिवाय आ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आदी राज्यपालांच्या स्वागतप्रसंगी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये प्रथम स्थान आणि सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या पदविकांक्षींना आचार्य पदवी, पदव्युत्तर पदवी व पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, आदिवासीबहुल भागामध्ये शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध करून देताना नियमित अभ्यासक्रमाबरोबरच रोजगारक्षम उपक्रमांमुळे गोंडवाना विद्यापीठ आदिवासी जनतेच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आदिवासी नागरिकांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणण्याची विद्यापीठामध्ये प्रचंड क्षमता आहे. विद्यापीठाकडून आपल्याला खूप अपेक्षा आहेत. या भागातील लोकांच्या समस्या जाणून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचे विद्यापीठाच्या मदतीने नियोजन करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना आयआयटी, आयआयएम यासारखे उच्च दर्जाचे तसेच रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करण्याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

विद्यापीठाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील – मंत्री मुनगंटीवार

तब्बल 15 वर्ष परिश्रमपूर्वक अभ्यास केल्यावर विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त होते. ही पदवी विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देते. संसदीय आयुधांचा वापर करून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाकडे निधीची मागणी केली असून विद्यापीठाचा विस्तार करून संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असे सुंदर विद्यापीठ येथे निर्माण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून विद्यापीठाचे नाव पूर्ण महाराष्ट्रात व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाने मला डी.लिट्. देऊन माझा सन्मान केल्यामुळे माझ्या वडीलांचे मी डॅाक्टर व्हावे हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कुलगुरु डॉ.प्रशान्त बोकारे यांनी प्रास्ताविकातून विद्यापीठाच्या प्रगती अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर आणि प्रा.डॉ.अपर्णा भाके यांनी, तर आभार कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी व्यक्त केले.

या दीक्षांत समारंभानिमित्त सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये पदवी घेणाऱ्यांची संख्या 10 हजार 226 इतकी असून 55 विद्यार्थ्यांना पीएच.डी. तर 41 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 13 हजार 607 इतकी आहे. त्यात 25 विद्यार्थ्यांना पीएच डी., एका विद्यार्थ्याला एम.ई. संशोधन पदवी, तर 41 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

पालकमंत्र्यांची अनुपस्थिती, समन्वयाचा अभाव

राज्यपाल जिल्ह्यात येत असताना त्यांच्या स्वागतासाठी पालकमंत्र्यांनी उपस्थित राहण्याचा प्रघात आहे. मात्र गडचिरोलीचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. विशेष म्हणजे विद्यापीठाने त्यांना मानद डी.लिट. देण्याचेही जाहीर केले होते. तरीहीसुद्धा ना.फडणवीस राज्यपालांच्या स्वागतासाठी आणि डी.लिट्. स्वीकारण्यासाठी आले नाही.

दीक्षांत समारंभानंतर साधारण निमंत्रितांसाठी भोजन कक्ष सुरू करण्यात आला, पण वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय व्हीआयपींच्या भोजन कक्ष सुरू केला जाणार नाही, असे तेथील जबाबदारी सांभाळणाऱ्या विद्यापीठाच्या प्रतिनिधीने सांगितले. पत्रकारांना राज्यपालांच्या निमंत्रणावरून विश्राम भवनात चर्चात्मक भेटीसाठी जायचे असल्याने पत्रकार भोजन कक्षाकडे वळले, पण त्यांनाही परत जावे लागले. ही बाब जनसंपर्क विभागाला कळल्यानंतर त्यांनी धावपळ केली, पण तोपर्यंत सर्व माध्यम प्रतिनिधी निघून गेले होते.

मान्यवरांच्या हस्ते पदवी घेणे झाले दुरापास्त

सर्व सुवर्णपदकप्राप्त आणि पीएचडीधारकांना मंचावर बोलवून प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्याची विद्यापीठाची प्रथा होती. पण गेल्यावेळच्या पदवीदान समारंभापासून ती प्रथा मोडून मोजक्याच विद्यार्थ्यांना मंचावर बोलविल्याबद्दल सिनेट सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मोठा खर्च करून केला जात असलेला हा समारंभ विद्यार्थ्यांसाठी नाही तर कोणासाठी? असा सवाल सिनेट सदस्य दिलीप चौधरी यांनी उपस्थित करत हा मुद्दा सिनेटच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे सांगितले.