गडचिरोली : पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदान दिनानिमित्त तीन ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. यात एकूण 330 पोलीस अधिकारी-जवानांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. विशेष म्हणजे पहिल्यांदाच आत्मसमर्पित माओवाद्यांनी देखील रक्तदान शिबिरात उत्स्फुर्त सहभाग घेतला. कधीकाळी दुसऱ्यांचे रक्त सांडवणारे हात आता दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चे रक्त दान करतानाचे चित्र सुखद धक्का देणारे होते.
गडचिरोलीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी आणि उपजिल्हा रुग्णालय अहेरी यांच्या सहकार्याने पोलीस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता (अहेरी) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे ही रक्तदान शिबिरे झाली. (अधिक बातमी खाली वाचा)

रक्ताची आवश्यकता, त्याची मागणी व त्याच्या गरजेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि रक्तदात्यांचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी सन 2004 पासून 14 जून हा दिवस जगभरात जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलामार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते.
या शिबिरांमध्ये पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी (सिरोंचा) संदेश नाईक, तसेच विविध शासकिय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफचे पोलीस अधिकारी तथा अंमलदार, यासोबतच पोस्टे/उप-पोस्टे/पोमकें स्तरावरून आलेल्या नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून “रक्तदान हेच श्रेष्ठदान” ही भावना जपली. त्यातून 330 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
वर्षभरात 2800 युनिट रक्तसंकलन
या शिबिरांबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, गडचिरोली पोलीस दलामार्फत मागील वर्षभरात आयोजित वेगवेगळ्या रक्तदान शिबिरांदरम्यान आतापर्यंत जवळपास 2800 युनिट रक्तदान करण्यात आले. ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानाने आपल्याला मिळत असते. समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सर्वांनी किमान तीन महिन्यातून एक वेळा तरी रक्तदान करणे गरजेचे आहे.
रक्तदानामध्ये सहभाग नोंदवणारे अधिकारी, अंमलदार व आत्मसमर्पित माओवादी सदस्य यांना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. शिबिरांदरम्यान अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्यसाई कार्तिक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, मुख्य वैद्यकीय अधिकारी (पोलीस रुग्णालय) डॅा.सुनील मडावी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे / उप-पोस्टे / पो.म.केंद्रांचे प्रभारी अधिकारी, तसेच नागरी कृती शाखेचे पोउपनि धनंजय पाटील, पोउपनि चंद्रकांत शेळके, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि नरेंन्द्र पिवाल, जनसंपर्क शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. प्रतिक भदाणे व सर्व शाखांचे अधिकारी आणि अंमलदार, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमुने परिश्रम घेतले.
अहेरी-सिरोंचातही प्रतिसाद
पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता येथे झालेल्या शिबिरामध्ये अहेरी, भामरागड, एटापल्ली, हेडरी इ. भागातील पोलीस अधिकारी / अंमलदारांनी व नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. अहेरीच्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन धोटे, अहेरी ठाण्याचे पोनि हर्षल एकरे प्रामुख्याने उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा येथे झालेल्या शिबिरामध्ये सिरोंचा, जिमलगट्टा, असरअली, पातागुडम इ. भागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आणि नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक, वैद्यकीय अधीक्षक (सिरोंचा) डॉ.चेतना वरठी, वैद्यकीय अधिकारी (अहेरी) डॉ.ब्रम्हानंद पुंगाटी, वैद्यकीय अधिकारी (सिरोंचा) डॉ.करिष्मा नान्ने व डॉ.आदित्य सपकाळ, तसेच सिरोंचा ठाण्याचे पोनि. समाधान चव्हाण उपस्थित होते.