तलावाजवळ सापडला युवकाचा जमिनीत अर्धवट पुरलेला मृतदेह

हत्येची शक्यता, ओळख पटली नाही

कोरची : तालुक्यातील कोटरा ते बोगटोला रस्त्यालगतच्या गावतलावाजवळ एका 25 ते 35 वयोगटातील अनोळखी युवकाचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या युवकाची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला जमिनीत पुरले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरची पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत या घटनेचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

कोरची पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सदर मृतदेह तलावाजवळ खड्डा करून त्यात पुरण्यात आला होता. पण तो पूर्णपणे जमिनीखाली नसल्याने मृतदेहावरील माती बाजुला होऊन तो थोडा उघडा पडला होता. मृतदेह कुजण्याच्या स्थितीत असल्याने तो 8 ते 10 दिवसांपासून तिथे होता असा पोलिसांनी स्पष्ट केले.

मुलेटिपदीकस या गावचे पोलीस पाटील ईश्वरदास सत्तर कल्लो यांच्या तक्रारीवरून कोरची ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख आणि गावकऱ्यांनी मिळून तिथे पाहणी केली. त्या इसमाच्या अंगात पॅन्ट व शर्ट घातलेला असून दोन्ही हातात कडे होते. चेहरा पूर्णपणे काळा पडून अंगाला अळ्या लागलेल्या दिसत होत्या. पोलिसांनी मर्ग दाखल करत या घटनेचा तपास सुरू केला आहे.