गळफास प्रकरणातील प्रेयसी अजूनही बेशुद्ध, आरमोरीतील ‘त्या’ घटनेचे रहस्य कायम

आत्महत्येचा निर्णय पूर्वनियोजित होता?

आरमोरी : येथील एका अल्पवयीन युवती आणि तिच्या प्रियकराने एकाच खोलीत गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात प्रियकराचा मृत्यू झाला असला तरी ती युवती थोडक्यात बचावली आहे. मात्र ती अजूनही बेशुद्धावस्थेत आहे. त्यामुळे या घटनेमागील रहस्य कायम आहे. त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला, आणि तो अचानक घेतला की पूर्वनियोजित होता हे शोधण्याचे आव्हान आरमोरी पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

या घटनेतील मृत युवक राहुल गजानन सावसाकडे (20 वर्ष) हा मजुरी करत असताना त्याचे सदर अल्पवयीन युवतीशी प्रेमसंबंध जुळले. त्यातूनच दोघे भेटण्यासाठी म्हणून बर्डी परिसरातील राहुलच्या मित्राच्या खोलीवर गेले होते. ती खोली देलनवाडी येथील रहिवासी असलेल्या राहुलच्या मित्राने भाड्याने घेतली होती. राहुलने फोन करून मित्राच्या हाताने दोघांसाठी बिर्याणीही मागितली. पण बिर्याणी खाल्ल्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या दोराने त्याच खोलीत स्वत:ला फासावर लटकविले. एकाचा दोर पंख्याला तर एकाचा दोर स्लॅबमधील हुकला बांधलेला होता. यात राहुलचा लगेच मृत्यू झाला. पण त्याच्या प्रेयसीला अर्धवट गळफास लागल्याने ती बेशुद्ध झाली.

बराच वेळ झाल्यानंतरही राहुल फोन उचलत नसल्याने मित्रांनी खोलीवर जाऊन पाहिले असता त्यांना तिथे घडलेल्या प्रकाराने धक्का बसला. दोघांनाही त्यांनी रुग्णालयात नेले. त्या युवतीच्या गळ्यावरही दोरीने गळफास लागल्याने व्रण होते. पण तिच्या शरीरातील आॅक्सिजनचा पुरवठा अतिशय कमी झाल्याने ती बेशुद्ध झालेली होती. तिला पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरीच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. शुक्रवारीही ती शुद्धीवर आलेली नव्हती.

प्रेमप्रकरणाबद्दल घरचे लोक अनभिज्ञ?

राहुल आणि त्याची प्रेयसी वेगवेगळ्या जातीचे असल्याचे समजते. पण त्यांच्या या प्रेमप्रकरणाबद्दल राहुलच्या घरच्या लोकांना कोणतीही कल्पना नव्हती, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. युवतीच्या घरच्या लोकांकडे मात्र यासंदर्भात पोलिसांनी अद्याप फारशी चौकशी केलेली नाही. शिवाय युवती शुद्धीवर आलेली नसल्याने तिचेही बयाण होऊ शकलेले नाही. त्यामुळे राहुल आणि त्याच्या प्रेयसीने आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला हे गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे ज्या दोराने त्यांनी गळफास घेतला तो दोरही त्यांनी आणला होता, यावरून त्यांचा हा निर्णय पूर्वनियोजित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.