Home दैनंदिन बातम्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वामीनाथन फाउंडेशनचा पुढाकार

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वामीनाथन फाउंडेशनचा पुढाकार

'तालुकानिहाय कृषी धोरणाची गरज'

गडचिरोली : जिल्ह्यातील व्यापक भौगोलिक क्षेत्र व जमिनीचा पोत लक्षात घेऊन प्रत्येक तालुक्याच्या गरजेनुसार कृषी विकासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, पूरक व्यवसाय आणि स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर केल्यास महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनतर्फे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आयोजित “महिला शेतकरी सक्षमीकरण कार्यक्रम” या विषयावरील जिल्हास्तरीय भागधारक सल्लागार संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सौम्या स्वामीनाथन, फाउंडेशनघ्या समन्वयक डॉ.भवानी आर.व्ही., गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

महिलांचा कर्जफेडीचा दर उल्लेखनीय

जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, नुकत्याच आयोजित कृषी महोत्सवात भामरागडसारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या उत्कृष्ट शेती पद्धतींचे सादरीकरण झाले. अशा यशस्वी पद्धती इतर भागातही पोहोचविणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाकडून मधमाशी पालन, वनोपज क्लस्टर यांसारख्या पूरक व्यवसायांवर विशेष भर दिला जात आहे. महिला बचत गटांच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक करताना त्यांनी नमूद केले की, गडचिरोली जिल्ह्यातील महिला बचत गटांचा कर्ज परतफेडीचा दर राज्यात उल्लेखनीय आहे.

जिल्ह्यात शिंगाडा व अझोला संवर्धनासारखे प्रायोगिक प्रकल्पही राबविले जात असून दुर्गम भागात माहितीचा प्रसार व पावसाळ्यातील संपर्क तुटण्याच्या समस्या ही विकासातील मोठी आव्हाने असल्याचे त्यांनी सांगितले. मूलचेरासारख्या भागातील यशोगाथा इतर दुर्गम तालुक्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जमिनी स्तरावरील सखोल अभ्यास आणि विश्लेषण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध कृषी व सामाजिक उपक्रमांचे योग्य एकत्रीकरण केल्यास महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

महिलांना सक्षम करणारे उपक्रम

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील विधवा, परित्यक्ता व निराधार महिलांची यादी तयार करण्यात आली आहे. अशा महिलांना प्राधान्याने सक्षम करणारे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. तांत्रिक ज्ञान व कौशल्य विकासाच्या माध्यमातून या महिलांना सक्षम करणारा पथदर्शी प्रकल्प सुरू करता येईल, असे त्यांनी सुचविले.

शेती फायदेशिर करण्यावर भर

एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.सौम्या स्वामीनाथन यांनी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करताना सांगितले की, गडचिरोलीतील शेती केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता ती फायदेशीर व पोषणकेंद्री शेतीमध्ये रूपांतरित करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. कृषी क्षेत्राचा पोषण, आरोग्य व आहार विविधतेशी जवळचा संबंध असून उत्तम कृषी पद्धतींमुळे उत्पादकता वाढते. तसेच समाजाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

मार्केटिंग ही मोठी समस्या

धानोरा येथील ‘कोस्मिगड ऑरगॅनिक एफपीसी लिमिटेड’च्या सचिव रंजना नैताम यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीत 500 पेक्षा अधिक सदस्य आहेत. त्यापैकी सुमारे 60 टक्के महिला आहेत. सेंद्रिय शेती व बीज संवर्धनासाठी त्यांनी स्वतःची बीज बँक स्थापन केली असून उत्पादनाच्या विपणनाच्या समस्या अद्यापही मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोरची येथील महिला शेतकरी कुमारीबाई यांनी जांभूळ उत्पादनातील यशस्वी अनुभव सांगितला. सुरुवातीला 35 कुटुंबांच्या सहभागातून सुरू केलेल्या या प्रकल्पामुळे ग्रामसभेच्या पुढाकाराने मध्यस्थांची साखळी मोडीत निघाली आणि जांभळाला थेट किमान आधारभूत किंमत मिळवून देण्यात यश आले. नागपूरपर्यंत जांभूळ विक्रीमुळे महिलांना प्रतिगाडी 300 ते 400 रुपये नफा मिळाला आहे. आता या प्रकल्पाचा विस्तार आणखी चार गावांमध्ये केला जात आहे.

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात महेश मस्के व मेहेर गाडेकर यांनी एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या गडचिरोलीतील कार्याची व्याप्ती व आगामी उपक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी डॉ.श्रीराम कावळे, डॉ.भवानी आर.व्ही. आणि डॉ.वेणू मार्गम यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, जिल्ह्यातील महिला व पुरुष शेतकरी तसेच स्वयंसेवी संस्था व नागरी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.