एटापल्ली : कला व क्रीडा गुण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अभ्यासासोबतच क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांत सहभाग घेतल्यास शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असून योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास ते राज्य व देशपातळीवर यशस्वी होतील, असा विश्वास माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद हायस्कूल एटापल्ली येथे पंचायत समितीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय बाल कला व क्रीडा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन हर्षवर्धन आत्राम व सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी तहसीलदार हेमंत गांगुर्डे, तर विशेष अतिथी म्हणून एटापल्लीच्या नगराध्यक्ष रेखा गजानन मोहुर्ले, एसडीपीओ चैतन्य कदम, मुख्याधिकारी प्रणय तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भुषण चौधरी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पेंदाम, सहाय्यक गटविकास अधिकारी विद्याधर बुरीवार, तसेच न.पं.उपाध्यक्ष मिना नागुलवार उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एम.मसराम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कला व क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली गुणवत्ता सादर केली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले.
































