जिल्ह्यात 100 दिवसीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेला सुरूवात, 24 मार्चपर्यंत उपक्रम

संस्था, व्यक्तींनी दत्तक घेण्याचे आवाहन

Bacteria Fly Out Of Man S Mouth Sneezing At A Scared Friend Vector. Isolated Illustration

गडचिरोली : जागतिक आरोग्य संघटनेच्या ध्येयानुसार 2030 पर्यंत जगभरातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी देशभरातील 347 जिल्हृयांमध्ये 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. यात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमांमध्ये सामाजिक संस्था, व्यक्तींनी रुग्णाच्या आहाराचा खर्च देण्यासाठी त्यांना दत्तक घेऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

क्षयरोगाचा औषधोपचार सुरु असताना रुग्णाला सकस आहार घेणे गरजेचे असते. त्यासाठी निक्शय पोषण योजनेअंतर्गत केंद्र शासनातर्फ 1000 रुपये प्रतीमहिना याप्रमाणे 6 महिन्याच्या औषधोपचारापर्यंत एकूण 6000 रुपये दिले जातात. तसेच प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत सर्व क्षयरूग्णांना सामाजिक संस्था, सन्मानिय व्यक्ती यांनी दत्तक घ्यावे व त्यांना पोषण आहार किट द्यावी असे आवाहन केले आहे. या मोहिमेदरम्यान विविध विभागांकडून क्षयरोगाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची लक्षणे असल्यास तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्षयरोगाचा प्रसार थुंकीव्दारे एका रूग्णापासून दुसऱ्याला होत असतो. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. रोगप्रतीकारशक्ती कमी झाल्यावर क्षयरोगाचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात होतो. क्षयरोग प्रसाराचे प्रमाण कमी करणे व मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने सन 2025 पर्यंत देश क्षयमुक्त करण्यासाठी दि 7 डिसेंबर ते 24 मार्च 2025 पर्यंत 100 दिवसीय क्षयरोग मोहिम सुरू केली आहे.

2 आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा खोकला, भुक मंदावणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, संध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकीवाटे रक्त पडणे, पूर्वी क्षयरोग झालेले, क्षयरोग बाधित रुग्णाच्या सहवासात, एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषित व्यक्ती, 60 वर्षावरील व्यक्ती, मधुमेह बाधित, धुम्रपान करणारे व्यक्ती यांची क्षयरोगाबाबतची तपासणी केली जाणार आहे. तपासणीअंती निदान झालेल्या क्षयरुग्णास 6 महीने औषधोपचार शासकीय रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यातर्फे देण्यात येईल. क्षयरोगावरील तपासणी व औषधोपचार शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.