आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार निलंबित

धान खरेदीमधील गैरव्यवहाराचा ठपका

गडचिरोली : शासनाच्या आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांकडून केलेल्या धान खरेदीत आणि भरडाईत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांना निलंबित करण्यात आले. आदिवासी विकास महामंडळाच्या नाशिक येथील मुख्य कार्यालयाच्या व्यवस्थापकीय संचालक लिना बन्सोड यांनी ही कारवाई केली.

प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार यांच्याबाबत महामंडळाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने कोटलावार यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेत घेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला. त्यात राईस मिलमध्ये विद्युत जोडणी नसतानाही भरडाईचा करारनामा करणे, धानाची मिलिंग करणाऱ्या मिलर्सना बँक गॅरंटीपेक्षा जादा डीओ देणे, राष्ट्रीयीकृत बँकेची गॅरंटी न घेता सहकारी बँकेची गॅरंटी घेऊन धान भरडाईस परवानगी देणे. धान भरडाईच्या तुलनेत विजेचा वापर कमी असणे अशा अनेक बाबी संशयास्पद आढळल्याने कोटलावार यांना जबाबदार धरत निलंबित करण्यात आले. याप्रकरणी आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.