गडचिरोली : गडचिरोलीच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने तीन वर्षानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार पटकावत गडचिरोलीची मान उंचावली आहे. एटापल्ली तालुक्यातील जाजावंडीच्या जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षी महाराष्ट्रातून या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या दोन शिक्षकांमध्ये बेडके यांचा समावेश आहे. तीन वर्षापूर्वी सिरोंचा तालुक्यातील असरअल्लीच्या जि.प.शाळेतील शिक्षक खुर्शिद शेख यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी शिक्षक बेडके यांचे अभिनंदन केले. बेडके यांच्यासोबत कोल्हापूर येथील सागर बगाडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला. येत्या 5 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात बेडके यांना रजत पदक आणि 50 हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे.
एम.ए.,बी.ए्ड्. असलेले मंतैय्या बेडके यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांना हसतखेळत चांगले शिक्षण मिळावे यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत.
बेडके यांच्यासह त्यांच्या सेवांचा अभिमान- आयुषी सिंह
गडचिरोलीसारख्या मागास आणि दुर्गम भागातील एका जि.प.शाळेच्या शिक्षकाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्याचे वृत्त संध्याकाळी धडकताच सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी शिक्षक बेडके यांचे अभिनंदन करत त्यांचा आणि त्यांनी अतिदुर्गम आदिवासी भागात दिलेल्या सेवेचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.