गडचिरोली : देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॅा.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, म्हणजे ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. शिक्षकांबद्दलचा आदर व्यक्त करून त्यांच्या चांगल्या कामांचा गौरव करण्याचा दिवस म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. एवढेच नाही तर केंद्र आणि राज्य सरकारांकडून आदर्श शिक्षकांचा गौरवही केला जातो. पण जिल्ह्यात हजारांवर शिक्षक ज्यांच्या नियंत्रणाखाली काम करतात, त्या जिल्हा परिषद प्रशासनाला या शिक्षक दिनाचे कोणतेही महत्व वाटत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुळात गडचिरोली जिल्हा परिषदेला शिक्षक दिनाचा विसर तर पडलेला नाही ना, अशी चर्चाही शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.
तीन वर्षापूर्वीपर्यंत जिल्हा परिषदेत दरवर्षी न चुकता ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाचा सोहळा मोठ्या दिमाखात होत असे. प्रत्येक तालुक्यातून एका आदर्श शिक्षकाची निवड करून त्यांचा या दिवशी सत्कार केला जात होता. परंतू कोरोना काळापासून विस्कळीत झालेली ही परंपरा अजूनही सुरळीतपणे सुरू करण्यात जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभागाला यश आलेले नाही.
गेल्या दोन वर्षात आदर्श शिक्षकांचा सत्कार आणि शिक्षक दिनाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेत झाला नाही. यावर्षी तरी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाचा कार्यक्रम होईल अशी आशा शिक्षकांना होती, पण त्याला खो देण्यात आला आहे. कारण आदर्श शिक्षकांची निवड करणेच जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला अद्याप जमले नाही.
यासंदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विवेक नाकाडे यांना विचारले असता, आदर्श शिक्षकांची निवडच व्हायची असल्यामुळे हा कार्यक्रम शिक्षक दिनी घेऊ शकत नसल्याची हतबलता त्यांनी स्पष्ट केली. नव्याने रूजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनाही अद्याप हा बेशिस्त आणि बेफिकिर कारभार सुरळीत करण्यात यश आलेले नाही.