शिक्षक दिनाचे औचित्य साधत दिल्लीसह गडचिरोलीत जिल्ह्यातील शिक्षकांचा सत्कार

राष्ट्रपतींच्या हस्ते मंतैय्या बेंडके सन्मानित

गडचिरोली : शिक्षक दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जाजावंडीच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्लीत राष्ट्रपी द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना रजत पदक व 50 हजार रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय गडचिरोलीत झालेल्या जिल्हास्तरीय पुरस्कार वितरणात 12 प्राथमिक आणि एका माध्यमिक शिक्षकाला सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा (सन 2023-24) या उपक्रमात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या शाळांना सन्मानित पुरस्कृत करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात या सोहळ्याचे आयोजन केले होते.

खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय दैने, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीसह विशेष अतिथी म्हणून माजी आमदार हरीराम वरखडे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एम.भुयार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य वलोराम चौरे, कार्यकारी प्राचार्य धनंजय चापले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद उद्दरवार, उपअभियंता (यांत्रिकी) नितीन पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी 13 शिक्षकांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या 4 केंद्र प्रमुखांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात शासकिय व स्थानिक स्वराज्य संस्थेतून प्रतितालुका 3 याप्रमाणे 36 व जिल्हास्तरीय 3 आणि विभागस्तरीय 1 (तृतीय क्रमांक) अशा एकूण 40 शाळेतील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच खाजगी व उर्वरीत शिक्षण संस्थेतून प्रतितालुका 3 याप्रमाणे 36 व जिल्हास्तरीय 3 आणि विभागस्तरीय (प्रथम क्रमांक) अशा एकूण 40 शाळेतील मुख्याध्यापक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सोहळ्याचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी तर आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे यांनी केले. संचालन उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) अमरसिंग गेडाम व साखिब सुलताना यांनी केले.