गडचिरोलीत राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर परिचय मेळावा

योग्य जोडीदारासाठी व्यासपीठ

मार्गदर्शन करताना योगिता पिपरे, मंचावर प्रमोद पिपरे, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के व इतर

गडचिरोली : द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था आरमोरी आणि संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. वधू-वर व पालक परिचय मेळाव्यामुळे समाजातील सुशिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींना एकत्र आणुन योग्य जोडीदार मिळण्यासाठी व्यासपिठ उपलब्ध होत आहे, समाजाला आज याची गरज आहे, असे प्रतिपादन मेळाव्याच्या उद्घाटिका म्हणून बोलताना माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका योगिता प्रमोद पिपरे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर वासेकर, तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सहकार संघाचे संचालक प्रमोद पिपरे होते. त्यांनी अशा मेळाव्यातून पैशाची आणि वेळेची बचत होते. समाजातील नाती अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचे सांगितले.

प्रमुख पाहुणे म्हणून देवाजी सोनटक्के, एम.डी. चलाख, शिला सोमनकर, भैयाजी सोमनकर, तसेच विलास अड़किने आणि तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरपरिषदेतील पदाधिकारी, अधिवक्ता वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, विविध तेली समाज संघटनांचे प्रतिनिधी, सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक, व्यापारी वर्ग व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.

या मेळाव्यात चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 100 वधू-वरांनी सहभाग नोंदविला. पालकांसह एकूण सुमारे 300 जण उपस्थित होते. वधू-वरांनी आपला परिचय देत संवाद साधला. कार्यक्रमाचे संचालन पितांबर कुकडकर यांनी तर आभार प्रदर्शन गोपीचंद बोदलकर यांनी केले.