संताजी सोशल मंडळाच्या वतीने तेली समाजातील गुणवंतांचा सत्कार

आवडीच्या विषयात शिक्षण घेऊन पुढे जा- पिपरे

गडचिरोली : विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात जिद्द, चिकाटीने परिश्रम घेऊन यश प्राप्त करावे. विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे किंवा ज्या विषयाची आवड आहे त्याचेच शिक्षण घ्यावे व पालकांनी सुध्दा त्यांच्यावर डॉक्टर, इंजिनिअरच झाले पाहिजे म्हणून दबाव टाकू नये. मुलांच्या इच्छेनुसार शिक्षण देण्यास प्रोत्साहन द्यावे. तेली समाजातील विद्यार्थ्यांनी आतापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करून पुढील शैक्षणिक जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले. संताजी सोशल मंडळाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात तेली समाजातील दहावी, बारावी, तसेच एमपीएससी, युपीएससी, पीएचडी, एमबीबीएस तथा नवोदय स्कॅालरशिप उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी (दि.९) करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा.देवानंद कामडी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी तेली समाज महासंघ नागपूरचे युवा नेते उमेश कोराम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, पत्रकार अविनाश भांडेकर, मंडळाचे सचिव गोपीनाथ चांदेवार, उपाध्यक्ष अॅड.रामदास कुनघाडकर, कार्याध्यक्ष रामराज करकाडे, कोषाध्यक्ष राजेश इटनकर, प्रभाकरराव वासेकर, सुरेश भांडेकर, महादेव वाघे, सुधाकर दुधबावरे, सुधाकर लाकडे, हेमंत खोब्रागडे, विठ्ठलराव कोठारे, विष्णू कांबळे, शंकरराव कोठारे, भाऊराव मुडके उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा शिल्ड, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मंडळाचे सचिव गोपीनाथ चांदेवार यांनी तर संचालन रामराज करकाडे यांनी केले. आभार सुधाकर लाकडे यांनी मानले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.