Home दैनंदिन बातम्या बालिकेच्या मृत्यूनंतर महिला व बाल रुग्णालयात वादावादी

बालिकेच्या मृत्यूनंतर महिला व बाल रुग्णालयात वादावादी

डॅाक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप

गडचिरोली : येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दिभना येथील वंशिका साजन लेनगुरे या 11 महिन्याच्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने वादावादी होऊन तणाव निर्माण झाला होता. डॅाक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्या बालिकेचा अचानक मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान याप्रकरणाची चौकशी केली जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.वर्षा लहाडे यांनी स्पष्ट केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपासून तापाने ग्रस्त वंशिका या बालिकेची प्रकृती खालावत जात असल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पालकांनी तिला 4 मार्च रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल केले. दरम्यान गुरूवारी (दि.5) मुलीचे वडील साजन लेनगुरे यांनी मुलीची प्रकृती बिघडत असून तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे तेथील डॅाक्टरांना वारंवार सांगितले, पण संबंधित डॅाक्टर केबिनबाहेर येत नसल्याने मुलीलाच त्यांच्याकडे घेऊन जावे लागत होते, असे पालकांनी सांगितले. यादरम्यान मुलीचा अचानक मृत्यू झाला. डॅाक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा ठपका नातेवाईकांनी ठेवला. रक्त तपासणीत तिचे हिमोग्लोबिन अवघे 6.2 इतके कमी असताना तिला रक्त चढवण्यात आले नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयाच्या अधीक्षिका डॅा.माधुरी किलनाके यांनी त्या बालिकेला न्युमोनिया झाला होता आणि उपचार सुरूच होते, असे स्पष्ट केले. मात्र नातेवाईकांचे समाधान झाले नव्हते. तणाव निर्माण झाल्याने गडचिरोली ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण हेसुद्धा दाखल झाले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्पष्ट केले.