गडचिरोली : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत आज 10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात ही परीक्षा दोन सत्रामध्ये होणार आहे. पेपर -1 करीता 2343 उमेदवार 10 केंद्रांवर आणि पेपर-2 करीता 3271 उमेदवार 15 केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.
सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पहिला पेपर, तर दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुसरा पेपर होणार आहे. सकाळच्या पेपरला 10.10 वाजतानंतर आणि दुपारच्या पेपरला 2.10 वाजेनंतर प्रवेश दिला जाणार नाही. सदर परीक्षेदरम्यान केंद्रात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे राहणार आहेत. कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार झाल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे.
परीक्षेकरीता मुळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, शाळा-महाविद्यालयाचे अद्यावत ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र अनिवार्य राहील. काळ्या किंवा निळ्या शाईच्या बॉलपेन व्यतिरिक्त इतर इलेक्ट्रॅानिक साहित्य, कॅल्क्युलेटर, कागदपत्रे बाळगता येणार नाही, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कळविले आहे.