जिल्ह्यात अपघातांची मालिका, 24 तासात तिघांचा गेला बळी

शिक्षिकेसह ग्रामसेवकाचा समावेश

गडचिरोली शहरातील अपघातानंतर शिक्षिकेला उपचारासाठी हलविताना पोलीस

गडचिरोली : जिल्ह्यात बुधवारी अपघातांची मालिका घडली. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चार अपघातांमध्ये तिघांना जीव गमवावा लागला. त्यात गडचिरोलीतील कार्मेल शाळेच्या एका शिक्षिकेसह कोरची तालुक्यात एका ग्रामसेवकाचा मृत्यू झाला. तिसऱ्या अपघातात रानभूमी गावाजवळ एका अज्ञात वाहनचालकाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा बळी गेला.

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सकाळी कार्मेल शाळेच्या शिक्षिका ममता बांबोळे (40 वर्ष) रा.पोर्ला, हल्ली मुक्काम गोकुळनगर, आपल्या दुचाकीने शाळेकडे निघाल्या असताना बल्लारपूरकडून सिमेंट घेऊन आरमोरीकडे जात असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करताना चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत कोरचीपासून 4 किमी अंतरावर बेडगाव या गावाजवळ खासगी प्रवासी टॅक्सी उलटल्याने झालेल्या अपघातात दिलीप धाकडे यांचा मृत्यू झाला तर उज्वला आदेश राऊत ही महिला गंभीर जखमी झाली. याशिवाय आणखी एक महिला आणि चालक व्यंकट सिडाम हे जखमी झाले.

तिसऱ्या घटनेत रानभूमीजवळच्या अपघातात दुचाकीस्वार विजय बालमवार (रा.इंदिरानगर) यांचा मृ्त्यू झाला, तर संजय राजगडे हे गंभीर जखमी झाले. याशिवाय कोरची ते कुरखेडा मार्गावर ट्रक आणि बसमध्ये धडक होऊन काही प्रवासी जखमी झाले.