मतदान यंत्रांना त्रिस्तरीय सुरक्षा, 24 तास पोलिसांचा खडा पहारा

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर

गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरवरून 21 डिसेंबर, म्हणजे तब्बल 19 दिवस लांबल्यामुळे मतदान यंत्र (ईव्हीएम) सीलबंद करून ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आली आहे. त्यादृष्टिने पोलीस यंत्रणेने त्रिस्तरिय सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या भव्य इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी ईव्हीएम कक्षाबाहेर राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, त्यानंतरच्या दुसऱ्या स्तरात जिल्हा पोलिसांचा सशस्र पहारा, तर तिसर्‍या स्तरात स्थानिक पोलिसांचा पहारा लावण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे लावून कक्षाकडे जाणाऱ्या मार्गावर तारांच्या जाळीचे कवचही लावण्यात आले आहे. आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहनही सज्ज ठेवण्यात आले आहे.

गडचिरोलीत 46 मतदान केंद्रांवर 68.26 टक्के, म्हणजे 29 हजार 702 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दाखल याचिकांवर तातडीने सुनावणी घेताना दिलेल्या आदेशानुसार, निवडणूक रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांचे मतदान झाल्यानंतर एकत्रितपणे सर्वांची मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. शिल्लक असलेल्या 4 नगरसेवकपदाच्या उमेदवारांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे 21 डिसेंबरला सर्वांची मतमोजणी होईल. तोपर्यंत सर्व ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित सिलबंद करून ठेवल्या आहेत.