आरमोरी : येथील बर्डीवरच्या वडसा टी-पॅाईंटजवळ एका भरधाव टिप्परने दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्यांना धडक दिली. यात एकाला जीव गमवावा लागला तर दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर टिप्परचालक टिप्परसह पसार झाला. हा अपघात सोमवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास घडला.
सारंग रविंद्र शेंडे (31 वर्ष, रा.आवळगाव, ता.ब्रह्मपुरी) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्यासोबत दुचाकीवर असलेले डेव्हिड नवलू मडावी (35 वर्ष) आणि महेंद्र जांगधुर्वे (32 वर्ष, रा.येरकड, ता.धानोरा) हे जखमी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, हे युवक एका नातेवाईकाकडील लग्नासाठी आले होते. लग्न आटोपून ते आवळगावला गेले होते. तेथून परत आरमोरीकडे येत असताना त्यांच्या मोपेडला टिप्परने मागून जबर धडक दिली. यामुळे तिघेही रस्त्यावर फेकल्या गेले. या अपघातानंतर टिप्पर चालक वाहनासह फरार झाला. आरमोरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ज्या ठिकाणी अपघात झाला तो रस्ता अरूंद आहे. तो रूंद करून त्या ठिकाणी रस्ता दुभाजक तयार करावा अशी मागणी आरमोरीकर नागरिकांकडून केली जात आहे.
































