अभिमान ‘ऑपरेशन सिंदूर’चा ! सन्मान करू भारतीय सैन्यशक्तीचा..

तिरंगा रॅलीने दुमदुमले कुरखेडा

कुरखेडा : कुरखेडा शहरामध्ये बुधवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली. यामध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी सहभागी होऊन भारतीय सैन्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कुरखेडा तालुक्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

भारतीय स्वाभिमानाचा अभेद्य गड आणि देशाच्या सुरक्षेचे प्रतीक असलेल्या आपल्या सैन्यदलाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे अत्यंत धाडसी व यशस्वी अभियान राबवले. या अभूतपूर्व गाथेचा गौरव करण्यासाठी, आपल्या वीर जवानांना सलाम करण्यासाठी या तिरंगा यात्रेतून देशभक्तीचा जल्लोष करण्यात आला.

‘तिरंगा यात्रे’मधून सामर्थ्यशाली सैन्य दलाचे कौतुक माजी आमदार कृष्णा गजबे व उपस्थित मान्यवरांनी केले. या यात्रेत माजी सैनिक, महिला, तरुण अशा शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणला!

ही यात्रा हनुमान मंदिर देवस्थान ते गांधी चौक यादरम्यान काढण्यात आली. भारत मातेच्या प्रतिमेस अभिवादनाने यात्रेची सुरुवात होऊन राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.