गडचिरोलीत आज विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेचे होणार उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड यांच्या वतीने सार्वजनिक खाजगी-भागीदारी तत्वावर संचालित ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थे’च्या इमारतीचे उद्घाटन आज, दि.27 रोजी दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अडपल्ली येथे होणार आहे.

या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, तर विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लि.चे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.मिलिंद नरोटे, आ.रामदास मसराम, चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, तसेच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, लॉयड्स मेटल्सचे निवासी संचालक निवृत्त लेफ्टनंट कर्नल विक्रम मेहता, कार्यकारी संचालक व्यंकटेश सौंदर्यराजन, निवासी संचालक हिम्मतसिंग बेदला, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेत प्रवेशित विद्यार्थ्यांना विदेशी विद्यापीठात शिकण्याची संधी प्राप्त होणार आहे. ही तंत्रज्ञान संस्था गडचिरोली या मागास जिल्ह्यातील होतकरू व गुणवंत युवकांच्या तंत्रकौशल्य शिक्षणासाठी महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

या कार्यक्रमात दुबईतील ‘युथ पॅरा गेम्स’ची विजेती श्वेता कोवे हिचा सन्मान देखील करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयानजीकच्या अडपल्ली येथील विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात होणाऱ्या या समारंभाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, विद्यापीठाचे युआयटी प्रभारी संचालक प्रा.मनिष उत्तरवार यांनी केले आहे.