गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीच्या काल शनिवारी झालेल्या दुसऱ्या टप्यातील मतदानानंतर आज गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तीनही नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 10 वाजतापासून मतमोजणी सुरू होऊन 12 वाजेपर्यंत निकालाचा अंदाज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. यात तीनही नगर परिषदांचे मिळून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढलेल्या 23 उमेदवारांच्या, आणि 68 नगरसेवकपदासाठी लढलेल्या 339 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.
शनिवारी गडचिरोली नगर परिषदेच्या तीन प्रभागांसह आरमोरीतील एका प्रभागासाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी जेमतेम 65.57 टक्के एवढी होती. दि.2 डिसेंबरला झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या (70.60 टक्के) तुलनेत ही टक्केवारी कमी आहे. सकाळी थंडीमुळे मतदार घराबाहेर पडले नाही असे वाटत होते, पण दुपारीसुद्धा मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद नव्हता.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विविध मतदान केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली. यावेळी मतदार यादी, मतदानाची टक्केवारी, ईव्हीएम मशीनची स्थिती तसेच मतदारांसाठी उपलब्ध सुविधांचा त्यांनी आढावा घेतला व मतदान प्रक्रियेदरम्यान नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, याबाबत आवश्यक सूचना दिल्या. गडचिरोली नगरपरिषदेतील तीन प्रभागांसाठी 11 मतदान केंद्रांवर तर आरमोरी नगरपरिषदेतील एका प्रभागासाठी 3 मतदान केंद्रांवर हे मतदान घेण्यात आले.
तीनही ठिकाणी मतमोजणीसाठी सज्ज
मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. गडचिरोली नगर परिषदेची मतमोजणी कृषी महाविद्यालय सोनापूर येथे होणार आहे. येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी 7 आणि पोस्टल बॅलेटसाठी 1 असे एकूण 8 टेबल असतील. निकालाच्या एकूण 7 फेऱ्या होतील. देसाईगंज नगरपरिषदेची मतमोजणी देसाईगंज नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहात पार पडणार आहे. येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी 10 व पोस्टल बॅलेटसाठी 1 असे एकूण 11 टेबल निश्चित करण्यात आले आहेत. आरमोरी नगरपरिषदेची मतमोजणी तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे होणार आहे. येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी 3, तर पोस्टल बॅलेटसाठी 1 असे एकूण 4 टेबल ठेवण्यात आले आहेत. या
गडचिरोली नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी 7 तर नगरसेवक पदासाठी 131 उमेदवार, देसाईगंज नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी 6 आणि नगरसेवकपदासाठी 100 उमेदवार, तर आरमोरी नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी 10 व नगरसेवकपदासाठी 108 उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे.
































