गडचिरोली : पर्यटन क्षेत्र हे केवळ भटकंतीसाठीच नसून ते आर्थिक विकासाचे एक महत्वाचे साधन आहे. जिल्ह्यातील निसर्ग संपदा, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळे या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. या उद्देशाने आयोजित पर्यटन महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना चालना मिळावी, तसेच पर्यटनातून नवीन रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी 23 ते 27 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ मंगळवारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा, वारसा स्थळांवर भ्रमंती, तसेच स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून जिल्ह्यातील नैसर्गिक व सांस्कृतिक वैभव राज्यभरात आणि देशभरात पोहोचावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.