जिल्ह्यात 23 ते 27 सप्टेंबरदरम्यान पर्यटन महोत्सव, विविध उपक्रम

पर्यटनाला चालना द्या- जिल्हाधिकारी

पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने कमलापूरच्या हत्ती कॅम्पला अच्छे दिन येण्याची आशा निर्माण झाली आहे.

गडचिरोली : येत्या 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी दि.23 ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना सर्वदूरपर्यंत ओळख मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सर्व विभागांनी आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, उपवनसंरक्षक आर्या व्ही.एस., आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव, प्र-कुलगुरू श्रीराम कावळे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, पंकज नंदगिरीवार, सहायक प्राध्यापक प्रितेश जाधव आदींची उपस्थिती होती.

या महोत्सवासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, गोंडवाना विद्यापीठ, वन विभाग, भारतीय पुरातत्त्व विभाग, आदिवासी विकास विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, स्वच्छ भारत मिशन, नेहरू युवा केंद्र/ एनएसएस, उमेद-माविम-खादी ग्रामोद्योग, शिक्षण विभाग व पंचायत विभाग आदींना विशेष जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. स्वच्छता अभियान, कमी परिचित पर्यटन स्थळांची प्रसिद्धी, सुविधा तपासणी, तसेच डिजिटल प्रचार यावर विशेष भर देण्यात आला आहे.

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात 23 सप्टेंबर रोजी निबंध लेखन व बातमी लेखन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. 24 सप्टेंबर रोजी शाळांमार्फत पर्यटन जागरुकता मोहीम, वैद्यांचे औषधी वनस्पती प्रात्यक्षिक, तसेच पॅनेल चर्चा होईल. 25 सप्टेंबर रोजी वारसा फेरी, स्वच्छता अभियान, लोककथांचे कथन व पारंपरिक खेळांचे आयोजन होणार आहे. 26 सप्टेंबर रोजी आदिवासी उत्पादने व पर्यटन बाजारपेठ कार्यशाळा, आदिवासी फॅशन-शो व आदिवासी नृत्य कार्यक्रम होईल. 27 सप्टेंबर रोजी समारोप सोहळा व “परिवर्तन उद्घोष” कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी सहा पर्यटन गावे (सांस्कृतिक, जंगल, आरोग्य, जल, अध्यात्मिक व परिवर्तनशील) जाहीर करण्यात येणार आहेत. उत्कृष्ट गाव, विभाग व युवकांचा सत्कार करण्यात येईल.

यासोबतच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना ₹5001, ₹ 3001 व ₹ 1001 पर्यंतची पारितोषिके व मानपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. निवडक लेख व संशोधन लेख शैक्षणिक नियतकालिकांमध्ये प्रकाशित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा परिवर्तन समिती कक्षात (9422634002) किंवा कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) स्मिता बेलपत्रे यांच्याशी संपर्क करावा.

या महोत्सवात सोशल मीडिया प्रचारासाठी #gadchirolitourismfestival, #gadchirolitourism, #पर्यटनपरिवर्तनमहोत्सव २०२५ हे हॅशटॅग वापरण्यात येणार आहेत. स्थानिक युवक, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात नवे परिवर्तन घडून येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.