गडचिरोली : अलिकडे शेतीचे यांत्रिकीकरण वाढल्यानंतर शेतातील अनेक कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर होऊ लागला आहे. धानपिकाची रोवणी करण्यापूर्वी चिखलणी करण्यासाठीही ट्रॅक्टरचा हमखास वापर होतो. पण मातीने भरलेला तो ट्रॅक्टर तसाच गावात आणणार असाल तर 10 हजार रुपयांचा दंड भरण्याची तयारी संबंधित ट्रॅक्टर मालकाला ठेवावी लागणार आहे.
शेतातील मातीने भरलेला ट्रॅक्टर डांबरी किंवा सिमेंट रोडवर आणल्यानंतर ती माती रस्त्याला चिकटते. त्यावरून वाहने गेल्यास अपघात होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी आता मातीने भरलेले ट्रॅक्टर रस्त्यावर चालवायचेच नाहीत, असा आदेश परिवहन विभागाने जारी केला आहे. त्यामुळे शेतातील ट्रॅक्टरची कामे झाल्यावर ट्रॅक्टर रस्त्यावर आणण्यापूर्वी ट्रॅक्टरच्या चाकाची माती, तसेच ट्रॅक्टर कॅचव्हीलची माती शेतातच काढून ट्रॅक्टर रस्त्यावर काढावेत. माती न काढता ट्रॅक्टर रस्त्यावर चालविल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सदर दंड 10 हजार रुपयांपर्यंत असेल याची नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कळविले आहे.