
गडचिरोली : रंगपंचमीच्या निमित्ताने गडचिरोली शहरात शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ‘गर’ भरण्याची परंपरा यावर्षीही उत्साहात पार पडली. शहरातील त्रिमूर्ती चौक येथे लहान मुला-मुलींसाठी भरलेल्या मातीच्या भांड्यांच्या विशेष बाजारात महिलांसह बालकांनी उत्साहाने भांड्यांची खरेदी केली.
या परंपरेविषयी माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते उदय धकाते यांनी सांगितले की, “गडचिरोली शहराच्या स्थापनेपासून रंगपंचमीच्या दिवशी ‘गर’ भरण्याची परंपरा सुरू आहे. 8 ते 10 पिढ्यांपूर्वीपासून घरातील महिला लहान मुलींना या दिवशी मातीची भांडी घेण्यासाठी येथे आवर्जून आणतात. ही केवळ खरेदी-विक्री नसून सांस्कृतिक जतनाची प्रक्रिया आहे.”
पारंपरिक हस्तकलेला चालना
या ‘गर’मध्ये कुंभार समाजातील महिलांनी तयार केलेली विविध प्रकारची मातीची भांडी विक्रीसाठी उपलब्ध होती. त्यात मातीची चूल, कढई, पोळपाट-लाटणे, जातं, ग्लास, लहान माठ- गुंड, झारा, चमचा, खलबत्ता तसेच स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इतर साहित्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या वस्तू वर्षभर सहज उपलब्ध नसून, रंगपंचमीच्या दिवशीच मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणल्या जातात.
संस्कार आणि परंपरेची जपणूक
या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे लहान मुलींना खेळातून घरगुती भांड्यांची ओळख करून देणे आणि पारंपरिक संस्कारांची जपणूक करणे हा होता. ग्रामीण हस्तकलेला प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न आहे. रंगपंचमीनिमित्त भरविला जाणारा हा ‘गर’ गडचिरोलीच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. आधुनिकतेच्या युगातही परंपरेचे हे जतन नागरिकांसाठी अभिमानास्पद ठरत आहे.
उत्स्फूर्त प्रतिसाद
दरवर्षीप्रमाणे यंदाही दुपारी 4 वाजल्यापासून त्रिमूर्ती चौक परिसरात बाजार भरला. अनेक महिला या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होत्या. ज्यांच्या घरी लहान मुले नाहीत, तेही आपल्या नातेवाईकांच्या मुलांना ही मातीची भांडी भेट म्हणून देण्यासाठी मातीच्या भांड्यांची खरेदी करताना दिसत होते.
































