Home दैनंदिन बातम्या येनापूर – जयरामपूर मार्गावरील वाहतूक पाच दिवसांसाठी बंद

येनापूर – जयरामपूर मार्गावरील वाहतूक पाच दिवसांसाठी बंद

प्रकल्पाच्या विस्तारासाठी मोजमाप

गडचिरोली : आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीअंतर्गत कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचा लोहप्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या विस्तारित कामासाठी मुधोली चक नं.2, पारडी देव (रिठ) व जयरामपूर येथील खासगी, तसेच शासकीय जमिनीचे मोजमाप व भूसंपादन प्रक्रिया दिनांक 11 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे येनापूर ते जयरामपूर या मार्गावरील वाहतूक दि.10 ते 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

सदर भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन विरोध प्रदर्शन होण्याची शक्यता पाहता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने येनापूर ते जयरामपूर मार्गावरील वाहतूक 10 मार्च ते 14 मार्च 2026 या कालावधीत तात्पुरती बंद ठेवण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केला आहे.

यानुसार येनापूर ते जयरामपूर या मार्गावर दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक प्रतिबंधित राहील. मात्र प्रवासी बसेस, तसेच पाणी पुरवठा, महावितरण, दूरसंचार व रस्ते दुरुस्ती संदर्भातील अत्यावश्यक सेवा वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

सदर आदेश मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 116 अन्वये जारी करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत.