गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम), जिल्हा परिषद गडचिरोलीअंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदभरती प्रक्रियेच्या नावावर कोणी अज्ञात व्यक्ती लोकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्टीकरण देत ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित होणार असून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही. उमेदवारांनी अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकृत जाहिरात व सूचना संकेतस्थळावरच
जिल्हा परिषदेमार्फत वेळोवेळी कंत्राटी पदांच्या जाहिराती जिल्ह्यातील दैनिक वृत्तपत्रांमध्ये तसेच जिल्हा परिषद गडचिरोलीचे अधिकृत संकेतस्थळ www.zpgadchiroli.maharashtra.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात येतात. उमेदवारांच्या पात्र-अपात्र याद्या व भरती प्रक्रियेबाबतच्या सर्व सूचना देखील या संकेतस्थळावरच उपलब्ध करून दिल्या जातात.
उमेदवारांनी दलालांपासून सावध राहावे
अलीकडे काही अज्ञात व्यक्ती समाज माध्यमांतून नोकरीचे आमिष दाखवून उमेदवारांकडून पैशांची मागणी करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेने इशारा देत स्पष्ट केले आहे की, एनएचएम, जिल्हा परिषद गडचिरोली नोकरीसाठी कोणत्याही व्यक्तीकडून किंवा मध्यस्थांमार्फत पैसे स्वीकारत नाही. भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या आमिषांना किंवा गैरव्यवहारांना बळी पडू नये. अशा प्रकरणात उमेदवारांनी त्वरित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (एनएचएम) यांच्याशी संपर्क साधून तक्रार करावी.
कायदेशिर कारवाईचा इशारा
भरती प्रक्रिया ही पात्रता आणि गुणवत्तेच्या आधारेच पार पाडली जाणार असून कोणत्याही प्रकारच्या शंकेला वाव दिला जाणार नाही. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवर विश्वास ठेवावा आणि अफवांना बळी पडू नये. भरती प्रक्रियेतील प्रामाणिकपणा व पारदर्शकता हीच जिल्हा परिषदेची प्राथमिकता आहे, असे सीईओ सुहास गाडे यांनी स्पष्ट केले. तसेच भरती प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिला आहे. उमेदवार व नागरिकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवर विश्वास ठेवून भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.