अपघात रोखण्यासाठी अभ्यास करून उपाय शोधा – आयुक्त

रस्ते सुरक्षा समितीची बैठक

गडचिरोली : अपघातांच्या नेमक्या कारणांचा अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना करण्याच्या सूचना परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिल्या. त्यांनी अतिवेग, हेल्मेटचा अभाव आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणे या अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख बाबींचा सखोल अभ्यास करण्याची व त्यानुसार उपाययोजनांचे नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.3) रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक निलोत्पल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

अपघाताच्या प्रमुख कारणांवर भर

परिवहन आयुक्त भिमनवार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अपघातांमध्ये तीन बाबी सर्वाधिक दिसून येतात. त्यात राष्ट्रीय महामार्गावरील अपघात, दोनचाकी वाहनांचे अपघात आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत होणारे अपघात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर ITMS प्रणाली कार्यान्वित करून अतिवेगावर नियंत्रण आणा व त्याद्वारे ऑटोमॅटिक चलान जनरेट करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सोबतच महामार्गावर दुभाजक बसविणे, रस्त्यांची रुंदी वाढविणे आणि देखभाल दुरुस्ती वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. कामे टाळणाऱ्या कंत्राटदारांवर पोलीस प्रशासनाकडून एफआयआर दाखल करण्यास त्यांनी सांगितले. यासोबतच वाहनांच्या वर्गवारीनुसार दंड आकारणीचा प्रस्ताव तयार करणे, अपघातप्रवण मार्गांवरच आणि संध्याकाळी 6 ते 10 या वेळेतच ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम राबवणे, जिल्ह्यातील 31 अपघातप्रवण स्थळांना ब्लॅक स्पॉट मानून आवश्यक उपाययोजना करणे, तसेच ओव्हरलोड वाहनांवर नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना आखण्याचे त्यांनी सांगितले.

मृत्यू टाळण्यासाठी ‘गोल्डन अवर ट्रिटमेंट’ महत्त्वाची

अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी ‘गोल्डन अवर ट्रिटमेंट’ सर्वात महत्त्वाची असल्याचे सांगून आयुक्तांनी आरोग्य विभागाला त्वरित प्रतिसाद देण्यास सांगितले. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे व रस्ते सुरक्षा निधीतून नवीन रुग्णवाहिका खरेदीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी रस्ते सुरक्षा उपाययोजनांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना सादर करण्याचे निर्देश प्रादेशिक परिवहन विभागाला दिले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी जिल्ह्यातील अपघातांवरील माहिती सादरीकरणाद्वारे मांडली.

या बैठकीला जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी संजय त्रिपाठी, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋषिकांत राऊत, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारीगण उपस्थित होते.