गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सोबाय टुरिझम यांच्यावतीने 23 ते 27 सप्टेंबरदरम्यान झालेल्या पर्यटन महोत्सवाच्या चौथ्या दिवस गोंडवाना विद्यापीठातील ट्रायसेफ नवसंशोधन केंद्रातर्फे आदिवासी नृत्य स्पर्धा आणि बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यापीठाच्या सांस्कृतिक सभागृहात ही स्पर्धा झाली.
यावेळी नाटक सादरीकरण, गडचिरोली जिल्हयातील आदिवासी संस्कृतीवर आधारित नृत्य स्पर्धा आणि आदिवासी फॅशन शो चे आयोजन करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. तसेच ट्रायसेफ नवसंशोधन केंद्रातील नवउद्योजकांनी व उमेदच्या बचत गटांनी तयार केलेले खाद्य पदार्थ, वस्तू, साहित्य, तसेच इतर वस्तुंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
गडचिराली पर्यटन महोत्सव 2025 दरम्यान गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) स्मिता बेलपत्रे, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे निवासी संचालक ले.कर्नल (निवृत्त) विक्रम मेहता, प्रा.मनिष उत्तरवार हे उपस्थित होते. ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी वृषांक सोरते व सर्व कर्मचारी, तसेच सोबाय टुरिझमचे संस्थापक पंकज नंदगिरीवार यांनी सदर कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.