गडचिरोली : राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके आज (दि.30) एक दिवसाच्या गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहून आदिवासी विकास योजनांची अंमलबजावणी, स्थानिक विकासकामांचा आढावा आणि लाभार्थ्यांना योजनेचा लाभ वितरण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नागपूर विभागातील आदिवासी विकास विभागाचा आढावाही ते गडचिरोलीत घेणार आहेत.

ना.उईके हे सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृहात पोहोचतील. सकाळी 10.30 वाजता शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा सेमाना येथे वृक्षारोपण. 11 वाजता सुमानंद सभागृह, आरमोरी रोड येथे आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन व विविध आश्रमशाळा तथा वसतिगृहांच्या इमारतींचे आभासी लोकार्पण ते करतील. यासोबतच पी.एम. जनमन व धरती आबा योजनांचा लाभार्थी मेळावा आणि विविध आदिवासी योजनांतर्गत लाभ वितरण कार्यक्रमात ते सहभागी होतील. दुपारी 1.30 ते 2.30 ही वेळ राखीव असून त्यानंतर दुपारी 2.30 ते 4.30 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नागपूर विभागीय आढावा बैठकीत आदिवासी विभागाच्या जनजाती न्याय महाअभियान, धरती आबा ग्राम उत्कर्ष योजना, वनहक्क दावे व अतिक्रमण संबंधित प्रश्न व आदिवासी महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी, या प्रमुख योजनांचा आढावा घेतील. यानंतर सायंकाळी सोयीनुसार गडचिरोलीहून यवतमाळकडे प्रयाण करतील.
मुख्यमंत्र्यांची आभासी उपस्थिती
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी व भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री जनजातीय न्याय महाअभियान व धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत लाभार्थी मेळावा व नवीन इमारतीचे आभासी पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) लोकार्पण तसेच भूमिपूजन सोहळा आज, दि.30 जुलै रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आभासी पद्धतीने हजेरी लावतील. उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार डॉ.नामदेव किरसान, आमदार सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, धर्मरावबाबा आत्राम, डॉ.मिलिंद नरोटे व रामदास मसराम तसेच आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बन्सोड, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभाग नागपूरच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आदिवासी विकास विभागाच्या बांधकाम व्यवस्थापन कक्षाचे मुख्य अभियंता आबासाहेब नागरगोजे उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी कळविले.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत कार्यालयीन इमारत, शालेय इमारत व मुलींचे वसतीगृह, गडचिरोली प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा सोडे, रेगडी, कारवाफा येथील मुला-मुलींच्या वसतीगृहाचे लोकार्पण, यासोबतच शासकीय आश्रमशाळा घाटी, येरमागड, भाडभिडी, अंगारा येथील मुला-मुलींचे वसतीगृह, अहेरी प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा बाम्हणी, गुड्डीगुड्डम येथील मुला-मुलींचे वसतीगृह, भामरागड प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा कोठी, जांबिया येथील मुलांचे वसतीगृह आदी बांधकामांचा भूमिपूजन सोहळा आभासी पद्धतीने होणार आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), नमन गोयल(भामरागड) व सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन मुत्यालवार यांनी केले आहे.
































