गडचिरोलीत रंगणार दोन दिवसीय आदिवासी महोत्सव

राष्ट्रीयस्तराची सांस्कृतिक स्पर्धा

पत्रपरिषदेत माहिती देताना डॅा.प्रणय खुणे व इतर पदाधिकारी.

गडचिरोली : आदिवासी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोलीत आदिवासी महोत्सव आणि राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून ‘कोया किंग आणि क्विन’ म्हणून विजेत्या स्पर्धकांना गौरविले जाणार आहे. हिरा सुखा बहुउद्देशिय आदिवासी संस्था आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या दोन दिवसीय महोत्सवात महाराष्ट्रासह छत्तीसगड, तेलंगाना, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यातील स्पर्धक सहभागी होणार असल्याचे मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॅा.प्रणय खुणे व इतर आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दि.28 आणि 29 जानेवारी असे दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते यांच्या हस्ते आणि आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा दिव्याज फाउंडेशनच्या संचालिका अमृता फडणवीस विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.

धानोरा रोडवरील महाराजा हॅालमध्ये होणाऱ्या या महोत्सवात दि.28 रोजी संध्याकाळी 5 वाजता एकल गीतगायन स्पर्धा, तर संध्याकाळी 7.30 वाजता आदिवासी नृत्य (ग्रुप) स्पर्धा होणार आहे. दि.29 रोजी आदिवासी सांस्कृतिक साहित्य व वेशभुषा स्पर्धा आणि बक्षीस वितरण होणार आहे.

पत्रपरिषदेला नियोजन समितीचे रमेश अधिकारी, मनीषा मडावी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.