गडचिरोली : आदिवासी समाजाला योग्य न्याय देण्यासाठी व समाजाला पुढे नेण्यासाठी, आदिवासी समुदायांचे सक्षमीकरण व आदिवासी परंपरेचे संरक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा विधानसभा निवडणूक संचालन समितीचे सहसंयोजक अशोक नेते यांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे झालेल्या आदिवासी महामेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सकल आदिवासी समाज संघटनेद्वारा आयोजित 500 वा विरांगणा महाराणी राणी दुर्गावती जयंती महोत्सवानिमित्त देवळी येथील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात या महामेळ्याचे आयोजन केले होते. या महामेळाव्याला मंचावर अनुसूचित जाती / जनजाती सांसदीय समितीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते, वर्धाचे माजी खासदार रामदास तडस, जेष्ठ आदिवासी नेते तथा आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त जनार्दन पंधरे, भाजपचे वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, देवळी-पुलगांव भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख राजू बकाने, माजी आमदार संजय पुराम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण उरकांदे, भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर आत्राम, वर्धा जिल्हा संयोजक राहुल चोपडे, भाजपा चिटणीस अर्चना वानखेडे, देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, जि.प.सदस्य मयुरी मसराम, पं.स.सदस्य दुर्गा मडावी, तसेच मोठया संख्येने आदिवासी बांधव व महिला भगिनी उपस्थित होते.
यावेळी अशोक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या विविध योजना आदिवासी समाज घटकापर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसामुंडा जयंती आदिवासी जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे काम मोदीजींच्याच सरकारने केले आहे. एवढेच नाहीतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून द्रोपदी मुर्मू यांना सर्वोच्चपदी विराजमान करण्याचे काम सरकारने केल्याचे ते म्हणाले.