गडचिरोली : आदिवासींनी आपल्या शेतजमिनी भाडेतत्वावर खनिज काढण्यासाठी देण्याबाबत राज्य शासन घेणार असलेला निर्णय आम्हाला कदापिही मान्य नाही. हा निर्णय आदिवासींच्या हिताचा नाही. त्यांना उद्ध्वस्त करणारा आहे, असे सांगत आदिवासी समाजाच्या वतीने येत्या 2 आॅक्टोबरला गांधी जयंतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करणार असल्याची माहिती ग्रामसभांचे मार्गदर्शक डॅा.देवाजी तोफा आणि इतर आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींनी येथे पत्रपरिषदेत दिली.
यावेळी रविंद्र कोवे (महाराज), नितीन पदा, माधव गावळ, कुणाल कोवे, डॅा.साईनाथ कोडापे, शिवाजी नरोटे, प्रशांत मडावी, गणेश वरखड यांच्यासह विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हा हा अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित आहे. त्यामुळे येथे पेसा कायदा तसेच अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनाधिकार) कायदा 2006 याची काटेकोर अंमलबजावणी करणे हे शासनाचे घटनात्मक कर्तव्य आहे. परंतू त्या कायद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आदिवासींच्या नावावर असलेल्या जमिनी गैरआदिवासींना भाडेतत्वावर देण्याचा प्रयत्न हा संविधानाचे कलम 46, तसेच वनाधिकार कायद्याचा स्पष्ट भंग आहे. पूर्वजांच्या संघर्षातून आजवर टिकवलेली जमीन यामुळे धोक्यात येत आहे. पडीक जमिनीच्या नावाखाली आदिवासींची सुपिक जमीनही यात लाटली जाईल, अशी भिती यावेळी तोफा यांनी व्यक्त केली.
अनुसूचित जमातीमधील घुसखोरी खपवून घेणार नाही
अलिकडच्या काळात काही गैर-आदिवासी प्रवर्गांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ठ करण्याचे प्रयत्न होत आहेत. तसे झाले तर अनुसूचित जमातींसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ, शैक्षणिक व रोजगाराच्या संधी, तसेच सामाजिक न्याय पूर्णपणे बाधित होईल. त्यामुळे ही घुसखोरी खपवून घेणार नसल्याचे यावेळी देवाजी तोफा म्हणाले.
पेसा पदभरती 2023 च्या उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याऐवजी कंत्राटी नियुक्ती देऊन शासनाने आदिवासी मुलांची फसवणूक केली. यात राज्यपालांच्या अधिसूचनेची सुद्धा पायमल्ली केल्याचा आरोप करण्यात आला. शासनाने त्या उमेदवारांना पेसाविरहित क्षेत्राप्रमाणे कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गडचिरोलीतील जात पडताळणी कार्यालय दुसरीकडे हलविण्याचा निर्णय मागे घ्यावा, आदिवासींची जात पडताळणी ही स्थानिक पातळीवरच व्हावी, जेणेकरून अर्जदारांच्या अडचणी कमी होतील, अशी मागणीही करण्यात आली.