गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे आदिवासी संग्रहालय उभारण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. हे संग्रहालय कसे असावे याचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेल्या गटाने नुकताच छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे जाऊन पाहणी करत तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या अभ्यास गटाने आपल्या दौऱ्यात रायपूर येथील संग्रहालयाची पाहणी केली. या संग्रहालयाच्या संचालिका गायत्री नेताम, सहसंचालक शाहू यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. दौऱ्यावरून परत आल्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश पंडा यांच्याशी चर्चा करुन रायपूर येथील आदिवासी संग्रहालयाची पुस्तिका त्यांना दिली.

अभ्यास गटात गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा.डॅा.नंदा सातपुते, गोंडवाना विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्राचे सदस्य तथा रा.तु.म.नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, प्रा.डॅा.कुंदन दुफारे, इंजिनिअर उमेश राठोड यांचा समावेश होता.












