गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कारवाफा बिटस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा सेमाना बायपास मार्गावरील धनुर्विद्या मैदानावर सोमवार, ६ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. उद्घाटक म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन झाले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.प्रभु सादमवार, सुधाकर गौरकर, गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उर्मिला सिडाम, भाऊराव नन्नावरे, चंद्रशेखर सिडाम, केशव चव्हाण, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, प्रमिला दहागावकर, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, मुख्याध्यापक विजय देवतळे, मंगेश ब्राह्मणकर, अनिल पवार, सुनील नन्नेवार, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश गेडाम, संतोष कन्नाके, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, दादाजी सोनकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रफुल पोरेड्डीवार म्हणाले, आदिवासी विद्यार्थी कला व क्रीडा गुणांनी निपुण आहेत. संधी मिळाल्यास त्यांनी प्रकल्प, विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपला नावलौकिक वाढवावा. बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकास महत्त्वाचा असून स्नेहभाव व खेळभावनेने खेळाडूंनी खेळावे, असा सल्ला त्यांनी दिला.
उद्घाटनानंतर रविकांत पिपरे यांनी पंच व खेळाडूंना शपथ दिली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांनी, संचालन गुलाब डोंगरवार तर संदीप राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष लांडे, रामदास पिलारे, यशपाल पेंदाम, डाकराम धोंगडे, प्रतिभा बनाईत, संगीता मोडक, शारदा कोटांगले, प्रियंका दुबे, गणेश दुर्कीवार, अमीर उईके, ज्योती टेकाम, साई सिडाम आदींसह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
या शाळांचा आहे सहभाग
या संमेलनात गडचिरोली, कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही या शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित अशा एकूण आठ शाळेतील २९४ मुले व २३४ मुली असे ५२८ खेळाडू सहभागी होत आहेत. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक व लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे या वैयक्तिक खेळांचे आयोजन केले आहे. उद्घाटन कार्यक्रमादरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील मुलामुलींनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले. १७ वर्षाखालील वयोगटात मुलांचा कबड्डीचा उद्घाटनपर सामना कारवाफा व पोटेगाव संघादरम्यान झाला. यात पोटेगाव संघ विजयी ठरला.