कारगिल विजय दिनानिमित्त भर पावसात श्रद्धांजली समारंभ

अनेक मान्यवरांची उपस्थिती

गडचिरोली : कारगिल युद्धात भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहीदांना कारगिल विजय दिनानिमित्त गडचिरोलीत शनिवारी (दि.26) मानवंदना देण्यात आली. येथील कारगिल चौकातील स्मारकाजवळ झालेल्या या कार्यक्रमात पावसाळी वातावरणातही अनेक मान्यवरांसह गडचिरोलीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशभक्तीचा परिचय दिला.

कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आणि लॅायड्स मेटल्सच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच कारगिल स्मारक समिती, शासकीय पुनर्नियुक्ती माजी सैनिक संघटना यांनीही या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

यावेळी लॉयड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमीटेडचे निवासी संचालक ले.कर्नल (नि.) विक्रम मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॅा.नामदेव किरसान, माजी खासदार डॅा.अशोक नेते, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष घिसुलाल काबरा, न.प.चे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, ठाणेदार विनोद चव्हाण, चंद्रशेखर भडांगे, लॉयड्सचे हिम्मतसिंह बेडला, नटराजन, कर्नल (नि.) एस.के. महापात्रा, कर्नल (नि.) महेंद्रसिंह, कर्नल (नि.) रामनाथ स्वामी, मेजर (नि.) जितेंद्र नागपाल, कॅ.फगवा ओरन, सुभेदार मेजर पंजननाथन, सुभेदार ऋषी वंजारी, सुभेदार रामप्रताप शर्मा, माजी सैनिक जयवंत काटकर यांच्यासह अनेक माजी सैनिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. राजीव गांधी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी गोंडवाना सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहीदांना मानवंदना दिली. कार्यक्रमाची सुरुवात “अमर जवान” स्मारकावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले. तसेच वीर सैनिकांच्या कुटूंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारगिल चौक दुर्गाउत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष कालू गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, मार्गदर्शक सुनिल देशमुख, मोतीराम हजारे, नंदू कुमरे, प्रकाश धकाते, महेंद्र मसराम, रुपेश सलामे, राजू डोंगरे, राजेंद्र साळवे, सुचिता धकाते, निलिमा देशमुख, वनिता भांडेकर, विद्या कुमरे, वनिता धकाते, अंजली भांडेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन नंदू कुमरे यांनी, तर आभारप्रदर्शन महादेव वासेकर यांनी केले.