कुरखेडा : तालुक्यातील जांभुळखेडा ते लेंढारी दरम्यान दगडी कोळशाने भरलेल्या एका ट्रकने भर रस्त्यात पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी घेत आपला जीव वाचविला. पण या घटनेत ट्रकमधील दगडी कोळशासह संपूर्ण ट्रक भस्मसात झाला. यामुळे कोरची ते कुरखेडा मार्गावरील वाहतूक बऱ्याच वेळपर्यंत प्रभावित झाली होती.
प्राप्त माहितीनुसार, सदर ट्रक छत्तीसडमधून दगडी कोळसा घेऊन चंद्रपूरकडे जात होता. कोरचीकडून तो कुरखेडाच्या दिशेने येत असताना जांभुळखेडापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वळणावर त्या ट्रकने पेट घेतला. चालकाने याची माहिती दिल्यानंतर कुरखेडा नगर पंचायतचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. पण पेट घेतलेला दगडी कोळसा विझत नसल्याने देसाईगंज नगर परिषदेच्या मोठ्या अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले. बऱ्याच वेळानंतर ही आग आटोक्यात आली. पण तोपर्यंत ट्रकमधील दगडी कोळशासह ट्रक बऱ्याच अंशी जळून खाक झाला होता.
दरम्यान ही आग रस्त्यालगतच्या जंगलात पसरू नये म्हणून वनविभागाच्या पथकानेही घटनास्थळाकडे धाव घेऊन योग्य ती खबरदारी घेतली. हा ट्रक चंद्रपूर येथील कंपनीच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले.