मनसे जिल्हाध्यक्षांना ट्रकने ठोकले, हाताला गंभीर दुखापत

मच्छी मार्केटजवळ ट्राफिक जाम

गडचिरोली : शहरातील अपघाताच्या मालिकेत गुरूवारी आणखी एकाची भर पडली. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांना एका ट्रकची धडक बसली. यात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामुळे कारगील चौकाजवळील मच्छी मार्केटजवळ ट्राफिक जाम होऊन चंद्रपूर मार्गाने येणारी वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर मार्गाने सिमेंटचा ट्रक (क्रमांक एम.एच.34, बी 9289) गडचिरोली शहरात येत होता. या ट्रकचा चालक मद्याच्या नशेत होता असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मच्छी मार्केटजवळ मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांना या ट्रकची धडक बसली. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली. (अधिक बातमी खाली वाचा)

यादरम्यान सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे यांनी घटनास्थळी पोहोचून शहरातून होणाऱ्या या जड वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे सांगत असंतोष व्यक्त केला. यावेळी वाहतूकही रोखण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी चंद्रशेखर भडांगे, जखमी राजेंद्र साळवे इतरांना उचलून बाजुला करत वाहतूक सुरू केली.