कोरची : मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला हैदराबादवरून छत्तीसगडकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर उलटून दोन मजुरांना जीव गमवावा लागला. या अपघातात दोघे गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला. हा अपघात कोरचीपासून 2 किमी अंतरावरील मोहगाव फाट्याजवळ घडला.
मृतांमध्ये सागर कल्लो (19 वर्ष, रा.झेंडेपार), कैलाश कोवे (35 वर्ष, रा.मोहगाव/ वाकडी, तालुका कुरखेडा) यांचा, तर गंभीर जखमी राजेश गंगबोईर (28 वर्ष, रा.चमरोटोला, तालुका मोहला, छ. ग.), पुरूषोतम मडकाम (51 वर्ष, रा.चिचोली, तालुका अर्जुनी /मोर, जिल्हा गोंदिया) यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. तर प्रदीप नैताम हा किरकोळ जखमी असून त्याच्यावर कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, सीजी 07, बीए 9284 क्रमांकाचा ट्रक हैद्राबादवरून रायपूरला कोरचीमार्गे जात होता. त्याच मार्गे ट्रॅक्टर क्रमांक एमएच 40, बी 9573 जात असताना मोहगाव फाट्यावर ट्रकने ट्रॅक्टरला मागून जबरदस्त धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की, ट्रॅक्टर उलटून 4 मजूर त्याखाली दबले, तर एक बाहेर फेकल्या गेला. हे मजूर जलसंधारण विभागाच्या वतीने झेंडेपार गावाजवळ सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामावरील होते. याच कामावर चांदोना (तालुका कुरखेडा) येथून बांधकामासाठी सेन्ट्रीग साहित्य घेऊन ते झेंडेपारला ट्रॅक्टरने जात असताना हा अपघात घडला.
मोहगाव येथील नागरिक, बेडगाव पोलीस मदत केन्द्राचे प्रभारी पोलीस अधिकारी दिनेश खटोले व कोरची पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅक्टरखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढले.
अपघाताला कोण जबाबदार?
डोंगरगाव गावच्या फाट्याजवळ अनेक ट्रक चालक थांबतात. त्या ठिकाणी सर्रास मिळणारी दारू पितात आणि पुढे कोरचीमार्गे छत्तीसगडकडे निघतात. मुबलक प्रमाणात दारू मिळत असल्याने या मार्गावरून ये-जा करणारे अनेक ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत राहतात. बेडगाव घाटावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन अनेकदा अपघात घडले आहेत. सदर अपघातातील ट्रक चालक अभिषेक शर्मा हा मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवित असल्यामुळे घटनास्थळावरून पळ काढत असताना, कोरची पोलिसांनी त्याला रस्त्यात पकडून अटक केली.
जखमींवर कोरची येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉ.चेतना सिडाम, डॉ.शिव पुंडे यांनी प्राथमिक उपचार केले. पण ग्रामीण रूग्णालयाची 108 गाडी चंद्रपूरला दुरूस्तीसाठी गेल्याने, कुरखेडा येथील 108 गाडी बोलावून जखमींना गडचिरोलीला रेफर करण्यात आले.
































