अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील जंगलात हत्या झालेल्या रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या अंत्यविधीनंतर परतीच्या वाटेवर असलेली आष्टी आणि बोरी येथील नातेवाईकांची कार (एमएच 33, व्ही 8249) खमनचेरू आणि बोरीदरम्यान असलेल्या दिना नदीवरील विनाकठड्याच्या पुलावरून नदीपात्रात कोसळली. यामुळे जबर जखमी होऊन दोघांना जीव गमवावा लागला, तर दोन महिलांसह तिघे गंभीर जखमी झाले.
हा अपघात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. उंचावरून कार नदीच्या कोरड्या पात्रात उलटी कोसळली. यामुळे जबर मार लागून यादव विठ्ठलराव कोलपाकवार (73 वर्ष, रा.आष्टी) आणि सुनील मुरलीधर कोलपाकवार (55 वर्ष, रा.बोरी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय अभिजीत यादव कोलपाकवार (40 वर्ष, रा.आष्टी), अर्चना यादव कोलपाकवार (रा.आष्टी) व पद्मा सत्यनारायण कोलपाकवार (रा.बोरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना आधी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले.
यादव कोलपाकवार यांची पत्नी अर्चना आणि मुलगा अभिजीत, तसेच पद्मा सत्यनारायण कोलपाकवार यांनी गंभीर दुखापत झाली आहे. अभिजित कोलपाकवार हे सदर अपघातग्रस्त कार चालवत होते. अभिजीत हा आपल्या आई-वडिलांना घेऊन आष्टीवरून निघाला होता. दरम्यान बोरी येथून चुलत काका सुनील मुरलीधर कोलपाकवार आणि काकू पद्मा सत्यनारायण कोलपाकवार यांनीही नागेपल्ली गाठले. अंत्यविधी आटोपून परत घराकडे जाताना देखील हेच पाच जण वाहनात होते. काका सुनील आणि काकू पद्मा यांना बोरी येथे सोडून अभिजीत आपल्या आई-वडिलांना घेऊन आष्टीकडे जाणार होता. मात्र काळाने त्यापूर्वीच त्यांच्यावर झडप घातली.
































